राजकारण

आ. नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी

कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपचे आ. नितेश राणेंची शनिवारी पोलिसांकडून पाऊण तास चौकशी करण्यात आली आहे. तसेच नितेश राणे यांचे सहकारी गोट्या सावंत यांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. कणकणवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या दालनात नितेश राणेंची चौकशी झाली. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर उपस्थित होते.

भाजप आ. नितेश राणे यांनी चौकशीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणे म्हणाले की, माझी चौकशी कालच झाली होती. तसेच गोट्या सावंत यांची चौकशी सरू आहे. आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतो. सगळ्या बाबतीत आम्ही चौकशीसाठी तयार आहोत, असं आम्ही पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांना जी माहिती हवी होती, ती आम्ही दिली आहे.

राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा

संतोष परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे आणि त्यांचे सहकारी माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी परब यांची विचारपूस केली होती. या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामध्ये खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, आमदार नितेश राणेंनी परब यांच्यावरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून झाल्याचे सांगितले.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या चारही हल्लेखोरांना कारसह पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हल्लेखोरांनी संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची कबुली दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button