मुंबई : आशिष राय आणि अंकित उपाध्याय यांच्यामार्फत कंगना राणौत विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात कंगनाच्या नुकत्याच केलेल्या ‘भिक म्हणून स्वातंत्र्य मिळाले’ या विधानावर कारवाई करण्यासाठी मुंबईतील काँग्रेसचे महासचिव भरत सिंह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कंगना राणौत विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतने जगभरात प्रसारित झालेल्या मुलाखतींद्वारे बेजबाबदार विधान केले आहे, ज्यामुळे भारतीय नागरिक, महान माजी स्वातंत्र्यसैनिक, नायक आणि माजी नेत्यांच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का बसला आहे. हे राष्ट्रीय प्रतिष्ठेच्याविरुद्ध आणि घटनाविरोधी असल्याचे वर्णन केले आहे. या विधानाची तुलना देशात दंगली आणि दहशतीच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्याशी करण्यात आली आहे.
कंगना राणौत स्वातंत्र्य आणि महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सतत वादात सापडली आहे. कंगनाने एका वक्तव्यात म्हटले होते की, २०१४ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, ज्यावरून बराच वादंग पेटला होता. एवढेच नाही तर महात्मा गांधींबद्दल म्हणाली होती की, दोन्ही गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही. या विधानावरून मोठा गदारोळही झाला होता.
यानंतर मुंबई पोलिसांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शीख समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना राणौतवर गुन्हा दाखल केला आहे. शीख समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल आणि आयपीसीच्या कलम २९५ (अ) अंतर्गत त्यांच्याविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये कंगनाच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.