राजकारण

ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद निश्चित ?

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजप लवकरच मोठं गिफ्ट देणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारच्या सत्ताधारी यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिंदे यांना मंत्रिपद देणं जवळपास निश्चित झालं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या फेरबदलात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्यांचही सूत्रांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक केली. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. शिंदे यांचे समर्थक असलेल्या एका नेत्यानं सांगितले की, शिंदे यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. तसंच नगरविकास किंवा मनुष्यबळ यासारखी महत्त्वाची मंत्रालये देण्याचीही चर्चा आहे. शिंदे यांना भाजपमध्ये येऊन १५ महिने झालेत. आता त्यांना दिलेलं आश्वासन भाजप पूर्ण करणार आहे.

पंतप्रधान मोदी ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करुन घेतील, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे, मनमोहन सिंग सरकारमध्ये असतानाही शिंदे हे त्यांच्या सक्रिय कामांमुळे चर्चेत होते. त्यामुळे त्यांनी स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण केली होती. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुसऱ्या काळातील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असेल. फेरबदलासाठी एकूण २३ खाती निवडण्यात आल्याचं समजतंय. या खात्याच्या मंत्र्यांच्या कामाची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकशी केली. पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. मात्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या २१ कॅबिनेट आणि ९ स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि २९ राज्यमंत्री आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button