शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशी संसदही अस्वस्थ आहे : शरद पवार
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/03/sp.jpg)
मुंबई : कृषी कायद्यासंदर्भाच्या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशी संसदही अस्वस्थ आहे त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उद्या संसदेत उमटली तर चुकीचे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनाला १०० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्रसरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली. दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत. त्यामुळे उद्या (सोमवारी) काय होतेय हे पहावे लागेल असेही शरद पवार म्हणाले.
बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असलेल्या लोकांवर काय भाष्य करावं?
काही लोकांचं बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे अशा लोकांवर काय भाष्य करावं त्यांना महत्त्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपचे साक्षी महाराज यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विचारणा केली असता शरद पवार यांनी त्यांचं नांव न घेता चांगलाच समाचार घेतला.
बेजबाबदारपणे बोलण्याचं काही लोकांचं वैशिष्ट्य असतं. कुणी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत असतील कोण दहशतवादी म्हणत असतील तर अशा लोकांवर काय भाष्य करावं असा टोला मिश्किल हास्य करत शरद पवार यांनी लगावला.