नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्रातील भाजप सरकारसह राज्यांतील भाजप सरकारांनाही टीकेचा सामना करावा लागला आहे. यात मालिन झालेली मोदी सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मार्ग धरला आहे. याअंतर्गत भाजपने ‘सेवा ही संगठन’ नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांना लसीकरण अभियानात भाग घेण्यास सांगितले आहे. ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमांतर्गत नड्डा यांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्त्यांनी लसीकरण मोहिमेमध्ये योगदान देण्याबरोबरच मदत कार्य आणि स्वयंसेवी आरोग्य कर्माचाऱ्यांच्या प्रशिक्षणातही योगदान द्यावे.
लसीकरण मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या कार्यकर्त्यांना वय वर्षे ४५ च्या वरील लोकांना लसीचे दोन्ही डोस कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत. १८ ते ४४ वयोगटामध्ये, विशिष्ट गटांचे, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे, अशांचे लसीकरण करावे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांना डिलिव्हरी बॉय, ऑटो रिक्षा चालक, घर कामगार, वृत्तपत्र वितरक, गॅस सिलिंडर वितरक या सर्वांना लस घेण्यासाठी जागरुक करावे.
दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे १२ वर्षांखालील मुलांचे पालक हा आहे. या १२ वर्षांखालील मुलांच्या पालकांचे लसीकरण करून घेण्यावर भर देण्यात यावा. पक्षाचा हा निर्देश तज्ज्ञांनी वक्त केलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावेत, गरजुंना रुग्णालये आणि इतर ठिकाणी भोजण उपलब्ध करून देण्यासाठी रेशनची व्यवस्था करावी. कोरोना झाल्यानंतर सल्ला देण्यासाठी टेलीमेडिसिन कंसल्टन्सी आणि मेडिकल हेल्प सेंटर्स तयार करावेत, असेही नड्डा यांनी सांगितले आहे.