ठाणे : मुंब्रा, कळवा परिसरातील झोपडपट्ट्यांवरून मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर खाली करायला सांगता हे योग्य नाही. केंद्र सरकार इतके निर्दयी कसे काय असू शकते? असा सवाल उपस्थित करतानाच सर्व कागदपत्रे असताना घराच्या बाहेर जायला सांगत आहेत, यांच्या बापाचं राज्य आहे का? असे म्हणत आव्हाड यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
कळवा आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपटपट्टी आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडही विधानसभेत मुंब्र्याचे प्रतिनिधीत्व करतात, त्यामुळे तिथल्या घरांवरून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेल्वे विस्तारीकरण होत असते तर मान्य होते मात्र केंद्र सरकारच्या जागेवर असलेल्या जागा खाली करायला सांगितले जात आहे, असा आरोप आव्हाड यानी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच कळव्यात अशाच पद्धतीने घर पाडण्यात येणार होती ती आम्ही पाडू दिली नाहीक आज त्या झोपड्या तशाच आहेत, असे आव्हाड म्हणाले आहेत.
भाजपचे ठरलेलं आहे की सर्वांना घाबरवून सोडायचं. निवडणूक आल्या की सांगायला येतील की आम्ही झोपड्या तोडू देणार नाही, अशी घणाघाती टीकाही आव्हाड यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केली आहे. या लढ्याचे नेतृत्व मी करणार आहे, मुख्यमंत्र्यांना आता मध्यस्थी करावी लागेल असेही आव्हाड म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकारचा न्याय आहे की झोपडपट्या ना संरक्षण मिळायला हवे. मर जायेंगे ,जान दे देंगे घर नही देंगे, राष्ट्रवादी सर्वांना साथ देईल असा नाराही आव्हाड यानी दिला आहे. बाजूला रेल्वे ट्रॅक आहे, मी येऊन गेल्यानंतर बाकी नेते येतील, आता सर्व मोठे नेते लाईनने येतील, असा टोलाही त्यानी लगावला आहे. हा रेल्वे ट्रॅक बंद झाला तर अख्खा भारत बंद होतो. मीही १० बाय १० च्या घरात राहून आलोय. सार्वजनिक संडासाचा वापर मी देखील केलाय, जो डर गया वो मर गया, घाबरू नका घर तुटणार नाही असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.