मोदी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ करतात, समोरच्याचे ऐकून घेत नाहीत!
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची टीका
रांची : कोरोना संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वादही समोर येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेवेळी मोदींनी स्वत:चीच ‘मन की बात’ केली. ते समोरच्याचे ऐकूनच घेत नाहीत, अशी टीका सोरेन यांनी केली आहे. त्याबाबतचं ट्विट हेमंत सोरेन यांनी केलं असून आता हे ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे.
आदरणीय पंतप्रधानांनी आज फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची ‘मन की बात’ केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे.
सोरेन यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा हे ट्विट केलं. त्यानंतर हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणासहित अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी कोविड संकटावर चर्चा केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यापूर्वीच्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसोबतची बैठक लाईव्ह केली होती. त्यावर पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे केजरीवाल यांना माफी मागावी लागली होती.
केंद्राकडून मदत नाही
यावेळी झारखंडने कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाही केंद्र सरकारकडून काडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप केला आहे. आरोग्य सचिव अरुण सिंह यांच्या मते, राज्याला केवळ २१८१ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहेत. राज्य सरकार आपल्या स्तरावर बांगलादेशाकडून ५० हजार इंजेक्शन्स मागवू इच्छिते. परंतु केंद्राने अद्याप मंजुरी दिली नाही. याशिवाय झारखंडमध्ये व्हॅक्सिनचं संकटही वाढलं आहे. त्यामुळेच झारखंडमध्ये अद्याप १८ वर्षांवरील युवकांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे झारखंडने अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, आता झारखंडलाच ऑक्सिजन कंटेनर्सच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.