Top Newsराजकारण

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे; भाजपचा पलटवार

मुंबई: प्रसिद्ध गीतकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यातच भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे.

भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे सांगत जावेद अख्तर यांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी जावेद अख्तर यांच्या संघाबाबत केलेल्या विधानावरून प्रत्युत्तर दिले आहे.

प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेले विधान निषेधार्थ आहे. जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे. म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

जावेद अख्तर यांचे विधान बेशरमपणाचा कळस

आरएसएस, विश्व हिंदू परिषदसुद्धा तालिबानी वृत्तीचेच आहेत, हे जावेद अख्तर यांचे विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस असून, समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरतात की, या हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते टीका करत आहेत. हिंमत असेल तर, अफगाणिस्तानात जा आणि तालिबानवर टीका करा, असे हल्लाबोल करत जावेद अख्तर आपले विधान मागे घ्यावे, हिंदू समाजाची क्षमा मागावी. नाहीतर तुमच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला जाईल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबान आणि त्यांच्यासारखे वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर त्याचे स्वागत केले. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगले जीवन, रोजगार, चांगले शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण मुस्लिमांचा एक गट असा आहे की जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करु शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही आणि भविष्यातही कधीच तालिबानी बनू शकणार नाही, असे जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button