Uncategorized

बंगालमध्ये भाजपला भाजपचेच आव्हान; कार्यकर्त्यांकडून तोडफोड, तुफान हाणामारी

कोलकाता : तिकीट वाटपावरून भाजपमध्येच मोठा राडा सुरू झाला आहे. बाहेरच्या लोकांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज असून त्यांनी बंगालमधील अनेक शहरात रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मात देण्यासाठी केंद्रीय मंत्री, खासदारांची फौज पश्चिम बंगालमध्ये उतरवणाऱ्या भाजपला मात्र स्वकियांशीच लढावे लागत असल्याचं चित्रं आहे. भाजपने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लाहिरी यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. एवढेच नव्हे तर आम्ही लाहिरींना उमेदवारच मानत नाही, असं भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावलं. त्यामुळे भाजपची एकच धावपळ उडाली. अखेर पक्षाने लाहिरी यांचं तिकीट कापून जिल्हा महासचिव सुमन कांजीलाल यांना तिकीट दिलं.

जगतादल आणि जलपाईगुडीमध्येही असाच काही प्रकार झाला. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात टीएमसीतून आलेल्यांना तिकीट दिल्याचं कार्यकर्त्यांना समजलं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी थेट तोडफोडच सुरू केली. जगतादलमध्ये भाजपने अरिंदम भट्टाचार्य यांना तिकीट दिलं होतं. परंतु कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केला. जलपाईगुडीतही असंच झालं. इथे तर कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयातच तोडफोड केली.

मालदाच्या हरिशचंद्रपूरमध्येही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. या ठिकाणी भाजपने मातिउर रहमान यांच्या नावाची घोषणा केली. मातिउर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. मालदाच्या ओल्डा मालदा सीटमध्ये गोपाल साहा यांच्या नावाची घोषणा केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत जोरदार निदर्शने केली. या ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली. गोपाल साहा यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचंच नुकसान होणार आहे, असं येथील भाजप कार्यकर्त्यांचंच म्हणणं आहे.

याशिवाय दुर्गापूर, पांडेश्वर मतदारसंघासहीत अन्य ठिकाणीही भाजपने स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत याचा निषेध नोंदवला आहे. तर काही ठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवून संताप व्यक्त केला आहे.

दोन उमेदवारांचा निवडणूक लढण्यास नकार
भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने पक्षाच्या दोन उमेदवारांनी स्वत:हून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. भाजपने बंगालचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोमेन मित्रा यांची पत्नी शिखा मित्रा यांना तिकीट दिलं होतं. मात्र, शिखा यांनी आपण आजही काँग्रेससोबत असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे एका टीएमसीच्या आमदार महिलेच्या पतीला भाजपने तिकीट दिलं. पण त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button