मुंबई: मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठं खुट्टं झालं की लगेच महापालिकेला दुषणं दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विशेषतः भाजपला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. दृश्यप्रणालीद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला. अजूनही कोविडचं संकट टळलं नाही. कोविड काळात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक आहे. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
myBMC Assist WhatsApp Chatbot Launch – LIVE https://t.co/3znmxenH8o
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 14, 2022
मतं मागताना जी लोकं वाकलेली, झुकलेली असतात ती लोकं मतं मिळाल्यावर ताठ होतात. आपण जो कार्यक्रम करत आहोत तो क्रांतीकारक आहे. आपली महापालिका देशातील नंबर एकची महापालिका आहे. कोविडने आपली जीवनशैली बदलली आहे. गर्दी न करता वर्क फ्रॉम होम करायला लावलं आहे. आपला देश मोबाईल फोन वापरण्यात एक नंबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो पण त्या प्रमाणात काम होतं का? व्हॉट्सअॅपचा उपयोग आपण कशाला करतोय? उपयोग आणि दुरुपयोग याचा फरक जाणून घ्या. हे तंत्रज्ञान समजून घ्या. तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्यांना व्हायला पाहिजे. नाही तर तंत्रज्ञान फुकट जाईल. तंत्रज्ञानाचा जनतेसाठी उपयोग होतो ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.
आपला कारभार उघडा आहे. जे काही आहे ते जनतेसाठी आहे. जनतेसाठी काम करत असताना लपवाछपवी कशाला? आपल्या कामाची सुरुवात चांगली झाली आहे. मात्र, ते मेंटेन ठेवलं पाहिजे. महापालिकेचं नेमकं काम काय आहे? कोविडच्या काळात जगालाही कसला अनुभव नव्हता. अशावेळी महापालिकेने चांगलं काम केलं. देशातील पहिलं कोविड सेंटर १५ ते २० दिवसात उभं केलं. नुसतं उभं केलं नाही. तर आपण ते मेंटेन केलं. काहींनी हे सेंटर बंद करण्यास सांगितलं. पण कोविडची साथ टळली नसल्याने बंद केली नाही. हे सेंटर बंद व्हावं असं वाटतं, असंही ते त्यांनी सांगितलं.
शहर स्वच्छ ठेवणं हे महापालिकेचं काम आहे. पण महापालिकेवरील ताण कमी करणं हे नागरिकांचं काम आहे. महापालिकेकडून जशी अपेक्षा आहे. तशीच पालिकेची नागरिकांकडूनही काही अपेक्षा आहे. महापालिका गटार सुद्धा साफ करते, पाणी पुरवठाही करते आणि स्वच्छताही राखते. महापालिकेचा कामगार मॅनहोलमध्ये जाऊन काम करत असतो याचंही भान नागरिकांनी ठेवलं पाहिजे. आम्ही काम करतो म्हणजे उपकार करत नाही. पण काय काय काम करावं लागतं हे जनतेला सांगणं गरजेचं आहे. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही काम करतो. या पालिकेचा तुम्हालाही अभिमान वाटला पाहिजे, असंही ते म्हणाले.