मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु ठेवलीय. मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचा एक मोठा नेता प्रयत्नशील असल्याचा आरोप केला आहे. मलिकांच्या या आरोपाला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
केंद्रात मोदीजींचं सरकार आहे. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? याऊलट आर्यन खान प्रकरणात एसआयटी तपासाचं काय झालं? या एसआयटीने आपली चौकशी का थांबवली? याची माहिती आधी द्या. फर्जीवाडा, फर्जीवाडा नाही तर हा भ्रष्टाचारवाडा आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना केलीय.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला आहे. असं असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केलाय. तसंच समीर वानखेडे यांना मुदतवाढ द्या. त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.