शासकीय कामातील हस्तक्षेप खपवून घेणार नाही; वळसे-पाटलांचा भाजप नेत्यांना इशारा
फडणवीस, दरेकरांवर कारवाईचे संकेत
मुंबई: मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजपचे इतर नेते पोलीस स्टेशनला पोहचले. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटलांनी दिला. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यात ५० हजार बाटल्यांचा रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचं पत्रं असल्याचं पोलिसांना माहीत नव्हतं. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्रं दाखवलंही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.
पोलीस कुणचाीही चौकशी करू शकतात
यावेळी ब्रुक फार्माच्या मालकाला का बोलावलं? कशासाठी बोलावलं? असा सवाल करण्यात आला. पोलिसांना कुणालाही बोलावण्याचा अधिकार आहे. कुणाचीही चौकशी करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
फडणवीस आणि दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. याबाबत चौकशी करूनच निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. खासगी पार्टीला हा साठा देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठ कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल. या कंपनीकडे अधिक साठा असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
पुन्हा चौकशी करू
फडणवीस यांनी दबाव टाकल्याने ब्रुकच्या मालकाला सोडण्यात आलेलं नाही, तर त्याने परवानगीचं पत्रं दाखवल्याने सोडण्यात आलं आहे. त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावू असं पोलिसांनी सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कुणा मंत्र्याच्या ओएसडीने धमकी दिल्याचं मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.
विरोधी पक्षाच्या दबावामुळे नाही तर त्या संचालकांनी दाखवलेल्या पत्रानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल. पुढे बोलताना त्यांनी खासगी किंवा राजकीय पक्ष यांना इंजेक्शन खरेदी करता येत नाही. सरकारला रेमडेसिवीर फक्त देण्याचा अधिकार आहे, असं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी ओएसडी यांनी धमकी दिल्याचं मला माहिती नाही, असं सांगितलं.
डोकानिया यांना घेऊन प्रवीण दरेकर FDA मंत्र्यांकडे गेले तेथे त्यांनी महाराष्ट्रात इंजेक्शन वितरीत करण्यासाठी परवानगी मागितली. परवानगी दिल्या नंतर FDA ने त्यांना पुरवठा करा असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी पुरवठा करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे यामागे काय उद्देश आहे? कोणासाठी हा साठा येणार होता, याची पोलीस चौकशी करत आहेत, अशी माहिती वळसे-पाटलांनी दिली.