मुंबई : दोन दिवसापूर्वी बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागल्यानंतर याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशा शब्दांत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या..
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्र भाजपने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे ११ कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत:
1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा
2)बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा..
आहे मंजूर?
अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच!— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
याचबरोबर, संजय राऊत आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपाला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. ‘बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!’, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे.