पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पदकांची लयलूट; नेमबाजीत सुवर्ण, थाळीफेकीत रौप्य, भालाफेकीतही दोन पदके
टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारतासाठी आजचा दिवस पुन्हा एकदा धडाकेबाज ठरला आहे. कारण आज भारताच्या खात्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जमा झालं. महिला नेमबाज अवनी लेखराने १० मीटर एअ स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्याशिवाय थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्य पदक मिळविले. भालाफेक प्रकारात देवेंद्र झझारीयाने रौप्य आणि सुंदर सिंग गुर्जरने कांस्यपदक पटकावलं.
योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत धमाका केला. योगेशने एफ५६ प्रकारात रौप्यपदक पटकावलं. योगेशचं पदक निश्चित होताच, मैदानात भारत माता की जयचा नारा घुमला. योगेशने ४४.३८ मीटर थाळीफेक करुन, आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. टोकियो पॅरालिम्पिक्समधील भारताचं हे पाचवं मेडल ठरलं. योगेशने आपल्या सहा फेऱ्यांमध्ये ४२.८४, ४३.५५, ४४.३८ मीटरपर्यंत थाळीफेक केली.
नऊ वर्षापर्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्या योगेश कथुनियाला २००६ मध्ये व्हिलचेअरवर यावं लागलं. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी फिजिओथेरिपी सुरु करण्यात आली. त्यासाठी त्याची आई स्वत: फिजिओथेरेपी शिकली. तीन वर्षानंतर आईच्या मेहनतीला यश आलं, योगेश पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला. योगेशने टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये जो कारनामा केला आहे, तो पाहून, त्याच्या कौतुकासाठी आज अख्खा देश त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे.
दुबईत कांस्य, टोकियोत रौप्य
योगेश कथुनियाने २०१९ मध्ये दुबईत झालेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियन्सशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यामुळे त्याला टोकियो पॅरालिम्पिक्सचं तिकीट मिळालं. या स्पर्धेत त्याने पुढची मजल मारुन, रौप्य पदकाची कमाई केली. योगेशने पॅरा स्पोर्ट्समध्ये पहिल्यांदा सर्वांचं लक्ष २०१७ मध्ये वेधलं होतं.
भालाफेकीत जबरदस्त कामगिरी
भारताच्या देवेंद्र झझारिया आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं. भालाफेकीच्या एफ४६ प्रकारात या दोघांनी भारताला पदकं मिळवून दिली.
अवनी लेखराचा सुवर्णवेध
टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल आहे. अवनी लेखराने १० मीटर एअर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली.