भारतातला पहिला “विगन” टेनिसपटू !
फलटण (नसीर शिकलगार) : काळानुरुप स्वतःमध्ये चांगले बदल करणं आपल्या प्रगतीसाठी लाभदायकच ठरतं. त्यात तुम्ही जर खेळाडू असाल, तर तुम्हाला जास्त सजग राहावं लागतं. तुमच्या खेळाचं स्वरुप, व्यायाम आणि तुमची पचनशक्ती त्यानुसार तुमचा आहार ठरतो. ही गोष्ट आहे अशाच एका खेळाडूची.. स्वतःमध्ये बदल घडवत, स्वतःचा खेळ सुधारत महाराष्ट्राच्या सातारा जिल्हातल्या फलटण तालुक्यातील एक टेनिस खेळाडू, विश्वजीत सांगळे झालाय भारतातला पहिला “विगन” टेनिसपटू !
टेनिस खेळण्यासाठी भरपूर ताकद हातात,मनगटात लागते. त्यासाठी अनेक जण मांसाहाराचा पर्याय निवडतात. पण मांसाहार पूर्ण वर्ज्य करुन, दूध, पनीर असे प्राण्यांपासून मिळणारे जिन्नस खाणंही त्याने बंद केलं आणि विश्वजीत सांगळेने भारताचा पहिला “विगन” टेनिसपटू होण्याचा मान मिळवत इतर खेळाडूंसाठी एक प्रेरणा दिली आहे.
भारतात निसर्गोपचाराला पूर्वापार महत्त्व आहे. आता ते पाश्चात्य देशानेही मान्य केले आहे. २०१७ पासून विश्वजीतनेही “विगन” होण्याकडे पहिलं पाऊल टाकलं. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात, जिथे दूध-तुपाला स्वयंपाकघरात खूप महत्त्व आहे, तिथे असा निर्णय घेणं सोपं नव्हतं. पण जिद्द आणि घरच्यांची साथ त्याला लाभली आणि आता तो “गुडमिल्क”, “ओरिजिन न्यूट्रिशन” यासारख्या अनेत “विगन” ब्रँड्सचा ब्रँड अँबॅसिडर झालाय.
विश्वजीत हा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील असून तो सध्या मुलुंड (मुंबई) येथे स्थायिक झाला आहे देश-विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व केले असून अनेक स्पर्धांमध्ये तो यशस्वी झाला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर एफ एफ टी अंतर्गत बारव्हीले, पॅरिस व एस टी एफ लिग सिंगापूर तसेच आय टी एफ किर्गीस्तान येथे खेळाचे उत्तम प्रदर्शन करून यश संपादन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर हिसार-हरियाना,कोची,त्रिवेंद्रम, कलकत्ता,औरंगाबाद, बडोदा,बंगलोर,पुणे,मुंबई येथील स्पर्धामध्येही यश मिळविले आहे
आता विश्वजीत स्वतःसारख्याच इतर “विगन” खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावलाय. त्यांना लागणारं सप्लिमेंट, न्यूट्रिशन हे इतर खेळाडूंपेक्षा वेगळं असतं. क्वचित महागही असतं. त्यांना स्पॉन्सरशिप मिळवून देणं, त्यांचं ब्रँड मॅनेजमेंट करणं यासाठी विश्वजीतने “एस्परर” नावाची स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी सुरु केली आहे. विश्वजीत म्हणतो, जगात माणुसकी कमी होत चालली आहे, पृथ्वीचा ऱ्हास आपण स्वतःच करत चाललोय. पृथ्वीचा समतोल बिघडत चाललाय. या सगळ्याला “विगनिजम” हे एकच उत्तर नसलं, तरी अनेक उत्तरांपैकी एक तर नक्कीच आहे.