अंबाजोगाईच्या दाम्पत्याचं अमेरिकेत नेमकं काय झालं?; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या!
बीड: अमेरिकेत नोकरी निमित्त वास्तव्याला असलेल्या अंबाजोगाई येथील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याच्या हत्येबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच अमेरिकेतील माध्यमांनी मात्र, पोलिसांच्या हवाल्याने धक्कादायक माहिती दिली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं उघड झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बालाजी रुद्रवार आणि त्यांची पत्नी आरती रुद्रवार हे अमेरिकेतील न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन येथे राहत होते. अर्लिंग्टन येथे सुमारे १५ हजार लोक राहतात. बालाजी आणि आरती यांना चार वर्षाची एक मुलगी असून आरती या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. काल या दाम्पत्याच खून झाल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, बालाजी यांनीच आरतीचा खून केला आहे. बालाजीने आरतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरती जेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी पळत होती, तेव्हा त्याने आरतीच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे आरतीच्या पोटातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आरतीने जागेवरच तडफडत जीव सोडल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे. पत्नीला मारल्यानंतर बालाजीनेही स्वत:ला संपवलं. बालाजी आणि आरतीचे मृतदेह घरातच पडून होते. बऱ्याच वेळानंतर त्यांची मुलगी रडू लागल्याने शेजाऱ्यांनी बाल्कनीतून या मुलीला रडताना पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर या दोघांची हत्या झाल्याचं उघड झालं.
शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच या दोघांचा मृत्यू कसा झाला हे सांगता येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार दोघांचाही भोसकून खून झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
भारत रुद्रवार यांच्या माहितीनुसार आरती या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. आम्ही अमेरिकेत आलो होतो. मुलाला भेटलो होतो. पुन्हा आमचा अमेरिकेला जाण्याचा प्लॅन होता. ते दोघेही आनंदी होते. त्यांचे शेजारीही चांगले होते. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाला? का झाला? हे मला माहित नाही, असं भारत यांनी सांगितलं. बालाजी आणि आरती यांचे मृतदेह मिळण्यात 8 ते 10 दिवस लागतील असं पोलिसांनी सांगितल्याचं भारत यांनी सांगितलं. माझी चार वर्षाची नात मुलाच्या एका मित्राजवळ आहे. अमेरिकेत त्याचे भारतीय वंशाचे अनेक मित्र होते, असंही भारत यांनी सांगितलं.
बालाजी रुद्रवार हा अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा मुलगा आहे. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी हे सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते. बालाजी हे ऑगस्ट 2015मध्ये पत्नीसह अमेरिकेत आले होते. डिसेंबर 2014मध्ये त्यांचे लग्न झाले होते.