भारतीय राजदूताचा पॅलेस्टाइन दूतावासात मृत्यू
रामल्ला : पॅलेस्टाइनमधील भारतीय राजदूत मुकुल आर्य यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. रामल्ला येथील भारतीय दूतावासात त्यांचा मृतदेह आढळला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आर्य यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. मुकुल आर्य यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
पॅलेस्टाइन परराष्ट्र मंत्रालयाने निवदेन प्रसिद्ध केले आहे. पॅलेस्टाइनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मुकुल आर्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आम्ही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात असून त्यांचे पार्थिव शरीर भारतात पाठवण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली जात आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास, पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांनी आरोग्य आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह सुरक्षा जवानांना, पोलिसांना रामल्ला येथील भारतीय राजदूतांच्या निवासस्थानावर दाखल होण्याचे निर्देश दिले आहेत. मुकुल आर्य यांच्या मृत्यूबाबत अधिक माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करून म्हटले की, पॅलेस्टाइनमधील भारतीय प्रतिनिधी मुकुल आर्य यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला आहे. ते एक प्रतिभावान अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्र परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.