हेडिंग्ले : हेडिंग्ले कसोटीतील पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय चुकला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांचे वस्त्रहरण केले. दोन फलंदाज वगळले, तर टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. १०५ चेंडू खेळून रोहित शर्मानं केलेल्या १९ धावा ही टीम इंडियाकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. जेम्स अँडरसन, ऑली रॉबिन्सन, सॅम कुरन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी टीम इंडियाची नाचक्की केली. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगडला.
पहिल्या दोन कसोटीत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देणारा अन् लॉर्ड्समध्ये शतक झळकावणारा लोकेश राहुल पहिल्याच षटकात माघारी परतला. ३९ वर्षीय गोलंदाज जेम्स अँडरसननं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यानं आणखी दोन फलंदाजांना माघारी पाठवून टीम इंडियावरील दडपण वाढवले. टीम इंडियाची अवस्था ३ बाद २१ अशी झाली होती. चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म याही सामन्यात कायम राहिला. अवघी एक धाव करून तो यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
कसोटीत विराट कोहली व रोहित ही जोडी प्रथमच सोबत खेळताना दिसली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. विराट ( ७) अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. अँडरसनच्या तडाख्यानंतर ऑली रॉबिन्ससन २ धक्के दिले. भारताचे एकेक शिलेदार माघारी जात असताना रोहित शर्मा दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ करून खिंड लढवत होता. अजिंक्य रहाणेनं त्याला चांगली साथ दिली, परंतु रहाणेला ( १८) रॉबिन्सननं माघारी पाठवले. रिषभ पंतही ( २) रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
१०५ चेंडू खेळून १९ धावा करणाऱ्या रोहितची महत्त्वाची विकेट ओव्हर्टननं घेतली. पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीही माघारी परतला अन् टीम इंडियाची अवस्था ७ बाद ६७ अशी झाली. सॅम कुरननं पुढच्याच षटकात सलग दोन धक्के दिले. ६७ धावांवरच टीम इंडियाचे चार फलंदाज माघारी परतले. रोहित व अजिंक्य यांनी ९२ चेंडूंत केलेली ३५ धावांची भागीदारी ही टीम इंडियासाठी सर्वोत्तम ठरली. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगडला. ओव्हर्टननं अखेरची विकेट घेतली.