नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्यापाठोपाठ फिजीयोंना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता भारतीय क्रिकेट बोर्डानं (बीसीसीआय) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) पाचव्या सामन्याचं वेळापत्रक निश्चित करण्यास सांगितलं आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे.
‘बीसीसीआय आणि ईसीबीचे दृढ संबंध लक्षात घेता बीसीसीआयनं ईसीबीला रद्द झालेल्या सामान्याचं वेळापत्रक आखण्याचा प्रस्ताव दिला. हा सामना कधी खेळवायचा, त्यासाठीची तारीख काय असावी यासाठी दोन्ही बोर्ड्स काम करत आहेत,’ अशी माहिती बीसीसीआयनं निवेदनाच्या माध्यमातून दिली. मँचेस्टरमध्ये होणारा पाचवा सामना रद्द करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी घेतला.
‘पाचव्या कसोटीच्या आयोजनासाठी बीसीसीआय आणि ईसीबीमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र भारतीय सपोर्ट स्टाफमधील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही,’ असं बीसीसीआयनं निवेदनात नमूद केलं आहे. बीसीसीआयनं निवेदनाच्या माध्यमातून ईसीबीचे सहकार्यासाठी आभार मानले असून क्रिकेट चाहत्यांची माफीदेखील मागितली आहे.