कोरोना लसीकरणात अमेरिका, चीनला मागे टाकून भारत जगात अव्वल
नवी दिल्ली : जगातील सर्वात वेगाने लसीकरण मोहीम राबवणारा भारत देश ठरला आहे. या लसीकरणात आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि कोरोना उद्यास आलेल्या चीन या दोन देशांना भारताने मागे टाकले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाला थोपविण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला जोरदार सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लसीकरणासाठी अल्पप्रतिसाद मिळाला. पण नंतर लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळू लागला. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून दिवसाला १ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीतही देशभरात वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात फक्त ८५ दिवसांमध्ये १० कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तर अमेरिकेत ८९ दिवसांत आणि चीनमध्ये १०२ दिवसांत १० कोटी डोस देण्यात आले होते. जगभरात वेगवान लसीकरणात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासंदर्भातले ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफिशअल अकाउंटद्वारे करण्यात आले आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी दररोज देशात ३८ लाख ९३ हजार २८८ जणांचे लसीकरण पार पडत आहे. ८५ दिवसांमध्ये अमेरिकेत ९ कोटी २९ जणांचे लसीकरण झाले होते. तर चीन आणि ब्रिटनमध्ये ८५ दिवसांत अनुक्रमे ६ कोटी १० लाख आणि २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले होते. भारत कोरोनामुक्त होण्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.