भारतात यंदा ९८ टक्के मॉन्सूनचा अंदाज
मुंबई : यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी सरासरी असा ९८ टक्के पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केला आहे. यंदाच्या पावसाच्या मौसमात पावसाचा अंदाज हा सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के दरम्यान लॉग पिरियड एव्हरेज (एलपीए) असा असेल. येत्या चार महिन्यांसाठी अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यापुढील अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी मांडण्यात येईल असे IMD मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा हवामानाचा अंदाज मांडण्यासाठी विशेष अशा मॉडेलचा वापर आयएमडी मार्फत करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीमार्फत वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा यासारख्या राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि जनतेला कोरोनाच्या या संकट काळात दिलासा देणारी बातमी आयएमडीने दिली आहे. अनेकांमार्फत तसेच शासकीय यंत्रणांकडून स्थानिक पातळीवर पावसाचा अंदाज मांडला जावा अशी मागणी करण्यात आली होती. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पावसाच्या अंदाजावरच अनेक उपाययोजना करणे शक्य होते, म्हणूनच ही मागणी अनेक संस्थांकडून करण्यात आली होती. स्थानिक पातळीवर पावसाचा अंदाज मांडण्यासाठीच क्लायमेट रिसर्च एण्ड सर्व्हीसेस (आयएमडी, पुणे) यांच्यामार्फत मल्टीमोडल एन्सेम्बल फोरकास्टिंग सिस्टिम हे पावसाचा अंदाज मांडणारे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. ग्लोबल क्लायमेट मॉडेलवर आधारीत हे मॉडेल आहे. तर एमएमई ही जागतिक पातळीवर स्विकारण्यात आलेले तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत पावसाचा अंदाज मांडण्याच्या पद्धती अधिक सक्षम करणे आणि अंदाज मांडण्यातील चुका कमी करणे हा उद्देश आहे. हे तंत्रज्ञान वापरून दोन टप्प्यात पावसाचा अंदाज मांडण्यात येतो.
एमएमई मॉडेलच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सध्याचा पावसाचा अंदाज मांडणाऱ्या स्टॅस्टिस्टिकल फोरकास्टिंग सिस्टिमचा वापर करण्यात येतो. तर दुसऱ्या टप्प्यातील एमएमईवर आधारीत फोरकास्टिंगमध्ये पावासाचा थेट अंदाज मांडण्यात येतो. एमएमईवर आधारीत पावसाच्या अंदाज मांडण्याच्या नव्या पद्धतीमध्ये मे महिन्यात पावसाचा अंदाज मांडण्यात येतो. दुसऱ्या टप्प्यात देशाअंतर्गत तसेच विभागवारही पावसाचा अंदाज मांडण्याची ही पद्धती आहे. यापुढच्या काळात आयएमडीमार्फत स्टॅस्टिस्टिकल पद्धती म्हणजे आकडेवारीवर आधारीत मॉडेल एवजी एमएमई फ्रेमवर्कचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांच्या कालावधीचा प्रत्येक महिनावार असा अंदाज मांडण्यात येईल. हा अंदाज प्रत्येक महिन्याच्या शेवटी मांडण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी आयएमडीमार्फत विशेष असा पावसाचा अंदाज पर्जन्य अधिक असणाऱ्या भागासाठी म्हणजे मॉन्सून कोअर झोनसाठी मांडण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक कृषी लागवड क्षेत्र असणाऱ्या भागासाठीचा हा अंदाज आयएमडी प्रकाशित करणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना पीक नियोजन करतानाच शेती विषयक उत्पादनासाठीचेही व्यवस्थापन करणे शक्य होईल. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हा अंदाज आयएमडी मांडेल.
दक्षिण पश्चिम मॉन्सूनसाठीचा अंदाज जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी आयएमडीमार्फत मांडण्यात आला. त्यानुसार ऑपरेशन स्टॅटिस्टिकल एसेम्बल फोरकास्टिंग सिस्टिमअंतर्गत हा अंदाज मांडण्यात आला आहे. या अंदाजानुसार देशात यंदा ९८ टक्के इतका सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आतापर्यंतच्या मॉन्सूनच्या अंदाजानुसार १९६१ ते २०१० या कालावधीत सरासरी पावसाची नोंद ही ८८ सेमी इतकी झाली आहे.
साधारणपणे पावसाच्या प्रमाणावर मॉन्सूनचा अंदाज ठरत असतो. त्यामध्ये लॉंग पिरियड एव्हरेज असा अंदाज चार महिन्यांच्या कालावधीसाठी गणला जातो. मॉन्सूनच्या कालावधीत कमी मॉन्सून ते एक्सेस म्हणजे अतिवृष्टीचा मॉन्सूनचा अंदाज असे परिमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसारच चार महिन्याच्या कालावधीचा पावसाचा अंदाज ठरतो. तूट म्हणजे ९० टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद असा अंदाज मानला जातो. सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के ते ९६ टक्के असा पाऊस गणला जातो. सरासरी म्हणजे ९६ टक्के ते १०४ टक्के अशी पावसाची गणना होते. तर सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०३ ते १०० टक्के दरम्यानचा पाऊस हा गणला जातो. अतिवृष्टी म्हणजे ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी म्हणून गणली जाते.