नवी दिल्ली: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने इंट्रानेझल बूस्टर डोसच्या चाचणीसाठी भारत बायोटेकला परवानगी दिली आहे. देशभरात ९ वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या केल्या जातील. डीसीजीआयच्या विषय तज्ज्ञ समितीने कंपनीच्या इंट्रानेझल लसीच्या फेज-३ बूस्टर डोस चाचण्यांसाठी मान्यता दिली आहे. या मंजुरीसाठी डीसीजीआयने कंपनीला तीन आठवड्यांपूर्वीच प्रोटोकॉल सादर करण्यास सांगितले होते.
भारतात पहिल्यांदाच नाकाद्वारे बूस्टर डोस दिला जातोय. भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे, ज्याने तिसऱ्या डोसच्या तिसऱ्या चाचणीसाठी अर्ज केला आहे. इंट्रानेझल लसीमध्ये ओमायक्रॉनसह कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा प्रसार रोखण्याची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले की, डीसीजीआयने काही अटींच्या अधीन राहून प्रौढ लोकांमध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या विक्रीला परवानगी दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन बाजारात विकण्यास परवानगी देण्यात आली असली तरी ती दुकानांमध्ये उपलब्ध होणार नाही. हे फक्त खाजगी रुग्णालये किंवा दवाखान्यातून घेतले जाऊ शकते. कोणत्याही व्यक्तीला पहिला, दुसरा किंवा तिसरा डोस मिळू शकतो. मात्र असे करताना कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. याचा अर्थ असा की बूस्टर डोस कोणीही मिळवू शकणार नाही. हा फक्त वृद्ध, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजारी व्यक्तींनाच दिली जाईल.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरांना फक्त पहिला आणि दुसरा डोस मिळू शकेल. यामध्येही त्यांना फक्त कोव्हॅक्सीन घेण्याची परवानगी असेल. परंतु १५ वर्षांखालील मुलांना अद्याप लसीकरण केले जाणार नाही. यासोबतच खासगी दवाखान्यात किंवा रुग्णालयात जी काही लस घेतली जाईल, त्याची माहिती पूर्वीप्रमाणेच कोविन अॅपवर द्यावी लागेल. देशात लसीकरण मोहीम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.