Top Newsराजकारण

संपावरील कर्मचारी वगळून अन्य एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा

मुंबई : राज्यभरात एसटीचे १९ हजार कर्मचारी रुजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे राज्य सरकारने या कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकाळीच याची माहिती दिली होती.

कामावर हजर झालेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार दिला आहे. मात्र, जे कर्मचारी अद्याप संप करत आहेत, किंवा कामावर परतलेले नाहीत त्यांचा पगार रोखण्यात आला आहे. जे कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत किंवा ज्यांच्या सेवा समाप्ती अथवा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अशा कर्मचार्‍यांना यातून वगळण्यात आले आहे. आज पासून पगार जमा होण्यास सुरूवात झाली असून तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

१४५ आगार अद्यापही बंदच आहेत. विवारी ७३४ बसेसद्वारे १७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ०४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रुपयांची भर पडली आहे.

एसटी महामंडळाच्या विभागांनी कर्मचाऱ्यांविरोधात कॅव्हेट दाखल केले असून निलंबित कर्मचाऱ्यांच्या परतीच्या मार्गात अडथळे येणार आहेत. कारण या कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार केल्याशिवाय कामावर रूजू होता येणार नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एसटी महामंडळाने प्रत्येक विभागात कामगार न्यायालयात हा संप बेकायदेशीर आहे, असे घोषित करण्याकरिता संदर्भ अर्ज सादर केलेले आहेत. येथे संप बेकायदेशीर घोषित झाल्यास कर्मचाऱ्यांवर सध्या सुरू असलेली कारवाई कायदेशीर ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button