राज्याला केंद्र सरकारकडून रेमडेसिवीरचा अपुरा पुरवठा : राजेंद्र शिंगणे
मोदी सरकारचा अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार : सचिन सावंत
मुंबई : राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. राज्याला रेमडेसिवीरची अधिक गरज असून केंद्राने ठरवलेल्या कोट्यापैकी १ लाख ७० हजार वाईल्स महाराष्ट्राला कमी आल्याचं अन्न व औषध प्रशासन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. याशिवाय, राज्यात लसींचा तुटवडा आजही जाणवत असल्याचं शिंगणे यांनी म्हटलं. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
राज्यात रेमडेसिवीरची आवश्यकता लागणार आहे. केंद्राने जो कोटा ठरवून दिला होता, त्या कोट्यापैकी १ लाख ७० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कमी आले आहेत. केंद्राने दररोज साडे सहा लाख रेमडेसिवीर पुरवल्या पाहिजेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे केंद्राने तुटवडा निर्माण करु नये, असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं. राज्याला रेमडेसिवीर मिळण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत आहेत, असं देखील शिंगणे यांनी सांगितलं. राज्यात आजही लसीचा तुटवडा असल्याचं शिंगणे यांनी सांगितलं. केंद्राकडे लसीची मागणी केली आहे, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
देशात कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. उद्यापासून म्हणजे १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकर करण्याचे जाहीर केले आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. केंद्राकडून लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुढे ढकलले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
केंद्रातील मोदी सरकारची लसीकरणातील दिरंगाई तरुणांच्या जीवावर उठणारी आहे. १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील देशाच्या तरुण कार्यशक्तीचे लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव आहे. जगात लसीकरण युध्दपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव चालला असताना ही मोदी सरकारची बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मध्यप्रदेशात लशींअभावी १ मेला लसीकरण सुरू होणार नाही असे स्पष्ट केले असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.