Top Newsराजकारण

उत्तर प्रदेशात अखिलेश देणार ‘समाजवादी भोजन थाळी’!

गाझियाबाद : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागलेत. भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात सत्ता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर समाजवादी पक्ष भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी सज्ज आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात समाजवादी पक्ष मतदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध घोषणा देत आहे. त्यातच अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आहे.

गाझियाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यानंतर १० रुपयात ‘समाजवादी थाळी’ देणार आहेत. या थाळीत पौष्टीक आहार असेल. त्याचसोबत उत्तर प्रदेशात ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार असल्याचंही ते म्हणाले. समाजवादी पेंशन योजनाही राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात येईल असं आश्वासन अखिलेश यादव यांनी दिलं आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गरीब जनतेला १० रुपयात शिवभोजन थाळी देऊ असं आश्वासन दिलं होतं. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाची विरोधकांनी खिल्ली उडवली होती. परंतु राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवभोजन थाळी सुरु केली. कोरोना महामारी काळात राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हजारो कुटुंबीयांची भूक भागली. आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी शिवभोजन थाळी योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात, जिल्हा रुग्णालय, बस स्थानकं, रेल्वे परिसर यासाठी शिवभोजन थाळी देण्यात येते.

अखिलेश यादव यांचा सूचक इशारा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर नाम्यांतून विविध घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. गाझियाबादमध्ये आज समाजवादी पक्षाचे नेते आणि आरएलडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजप सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा विकास खुंटला गेला असल्याचा आरोप केला. यामुळेच यूपीच्या जनतेनं यावेळी भाजप सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय केला आहे. कोरोनाच्या काळात मजुरांना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत त्यासाठी भाजपच जबाबदार आहे. मोदी सरकारमध्ये अन्नदाता देखील नाराज आहेत आणि ही निवडणूक मजूर व शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे भाजपला जोरदार प्रत्युत्तर या निवडणुकीत मिळेल, असं अखिलेश यादव म्हणाले. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकीच्यानंतर गुजरातमध्ये निवडणूक होणार आहे आणि भाजपला खरं सरप्राईज तिथंच मिळणार आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव निश्चित आहे. कारण भाजप नकारात्मक राजकारणाचा द्योतक आहे, असंही अखिलेश यादव म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button