शिर्डी : शिर्डीत साई दर्शनासाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण होत आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता भक्तांना सकाळी ६ ते रात्री ९ याचदरम्यान साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार आता भक्तांना सकाळी ६ ते रात्री ९ याच कालावधीमध्ये साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. रात्री नऊ नंतर राज्यात जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत, जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असेल. पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीला देखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच काकड आरती होणार आहे. तसेच मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन देखील मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.