पंढरपूर पोटनिवडणुकीत आवताडे विरुद्ध आवताडे संघर्ष पेटणार
सोलापूर : राष्ट्रवादीने पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Mangalvedha bypoll) भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिलीय. विशेष म्हणजे भगीरथ भालकेंच्या विरोधात भाजपनं समाधान आवताडे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. परंतु समाधान आवताडे यांना आता घरातूनच आव्हान मिळाले आहे. समाधान आवताडे यांच्या विरोधात चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत विजयसिंह मोहिते पाटील यांची मध्यस्थी निष्फळ ठरलीय. त्यामुळे आता आवताडे विरुद्ध आवताडे असा संघर्ष पेटणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 30 मार्च रोजी पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला, त्याच दिवशी त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे समाधान आवताडे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. सिद्धेश्वर आवताडे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बबनराव आवताडे यांचे चिरंजीव आहेत. मंगळवेढा खरेदी-विक्री संघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून दोन तासांपेक्षा जास्त वेळ बबनराव आवताडे यांची मनधरणी केली. मात्र सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढण्यावर ठाम असल्यामुळे त्यांची मनधरणी निष्फळ ठरली. यामुळे समाधान आवताडे यांना सिद्धेश्वर यांची उमेदवारी जड जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात सिद्धेश्वर आवताडे यांचा जनसंपर्क मोठा आहे. तसेच मंगळवेढा तालुक्यावर त्यांची मजबूत पकड आहे. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील गेल्या निवडणुकीमध्ये जोरदार आघाडी घेतली होती, त्या आघाडीमध्ये सिद्धेश्वर यांच्या उमेदवारीमुळे घट होण्याची चिन्हे आहेत.