नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
नागपूर: एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागल आखाडा परिसरात घडलेली ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली.
नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा स्वत:च्या घरी परतला आणि गळफास घेऊन त्यानं स्वत:ला संपवलं.
आरोपी आलोक मथुरकर याने त्याची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांचा स्वत:च्या राहत्या घरात खून केला. त्यानंतर तो शंभर फूटावर रोडच्या पलीकडे असलेल्या सासरी गेला. तिथे त्याने सासू लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घृण हत्या केली. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले. तर पत्नी मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोडा मारून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला. ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा संशय आहे. दुपारी १२ च्या दरम्यान घटनेचे वृत्त शहरात पसरले. त्यानंतर उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह शहरातील सर्वच्या सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी तहसील पाचपावली, गणेशपेठ, आणि अन्य ठिकाणचे ही ठाणेदार तसेच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला.