राजकारण

मणिपूरमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; ८ आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणार !

इंफाळ : देशातील विविध राज्यांत काँग्रेसमध्ये सुरू असलेले पक्षांतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकताच पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे. पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, पक्षामधील किमान आठ आमदार हे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनीही राजीनामा दिला आहे.

मणिपूरमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच पक्षात मोठी फूट पडल्याने काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे. काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. कॉन्थोजम हे विष्णूपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते. त्यांना डिसेंबर २०२० मध्ये मणिपूरचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार भाजपात दाखल झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पारडे जड होणार आहे.

दरम्यान, भाजपानेही मणिपूरमध्ये काही पक्षांतर्गत फेरबदल केले आहेत. भाजपाने शारदादेवी यांच्याकडे मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याला दुजोरा देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून शारदादेवी यांच्या नावाला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. त्यांच्या आधीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सायखोम टीकेंद्र सिंह यांचे मे महिन्यात निधन झाले होते.

दरम्यान, विविध राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसचे पक्ष संघटन अधिकाधिक कमकुवत होत चालले आहे. पक्षनेतृत्वाने पंजाबमधील वाद मिटवला असला तरी राजस्थानसह इतर राज्यांमध्ये अधूनमधून वाद उफाळून येत असल्याने काँग्रेस नेतृत्वाची डोकेदुखी वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button