मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर आज राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. राज ठाकरे आणि पवार यांच्यात जवळपास तासभर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिलीय.
एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावरही एसटी कर्मचारी चार दिवसांपासून संपावर बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही कळतंय.
काल एसटी कामगारांनी राज ठाकरे यांच्याकडे कायदेशीर बाबी मांडून त्यांच्या मागण्याही सांगितल्या होत्या. सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा सांगितलं. त्यावर राज ठाकरे यांनी कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. मी तुमचं नेतृत्व करेल. तुमच्यासाठी सरकारशी चर्चा करेल. मात्र तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन राज यांनी केलं होतं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं होतं.
एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने १२ आठवड्याची मुदत दिली आहे. समिती गठीत केली आहे. ही माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले. तसेच एसटी कामगारांसोबत मनसेचे वकीलही त्यांना कायदेशीर मदत करणार असल्यांचही त्यांनी सांगितलं होतं.