
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु झालेल्या महायुद्धाचा आज दुसरा अंक सुरु झाला. काल शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किरीट सोमय्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद संपून काही मिनिटंही होत नाही तोच संजय राऊतांनी सोमय्यांवर आरोपाचा नवा बॉम्ब फोडला आहे. तसेच पुन्हा एकदा सोमय्या पितापुत्र नक्कीच जेलमध्ये जाणार, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खा. संजय राऊत म्हणाले की, अलिबागमधले १९ बंगले कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे, हा माझा प्रश्न आहे. अर्जुन खोतकरांना त्रास का दिला जातोय, हा माझा प्रश्न आहे. भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा गुन्हा काय? , हा माझा प्रश्न आहे. अमोल काळे कुठेय? काय व्यवहार आहे हा? याची उत्तरं द्या.
ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही १५ कोटी दिले
राऊत यांनी आज पुन्हा एकदा सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपये जमवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सोमय्या यांनी १५ कोटी रुपये ईडीच्या एका अधिकाऱ्याला दिली असल्याचा सनसनाटी आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी पुन्हा एकदा ईडीलादेखील आव्हान दिलं आहे.
किरीट सोमय्या यांनी ईडी कारवाईची धमकी देऊन मुंबईतील जेव्हीपीडी येथील एक भूखंड बिल्डर असलेला मित्र अमित देसाई याला मिळवून दिला. या भूखंडाची किंमत १०० कोटींहून अधिक आहे. मात्र, ईडी कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी हा भूखंड कमी किंमतीत मिळवून दिला. किरीट सोमय्या यांनी १५ कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत.त्यातील किती टक्के ईडीकडे गेले आहेत ते बाहेर सांगत असतो, असं संजय राऊत म्हणाले. ८ जेवीपीडी येथील सुजित नवाब हा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी धमकी देत १०० कोटी रुपयांची जमीन मातीमोल किमतीला घेतली. ईडीची धमकी देऊन किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी नावावर करुन घेतला. ११० कोटी रुपयाचा प्लॉट किरीट सोमय्यानं मातीमोल किमतीला घेतला. त्यासंदर्भात लवकरच पुरावे घेऊन येईन. किरीट सोमय्यांनी त्यातील १५ कोटी रुपये ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे सागांव, असं संजय राऊत म्हणाले. पत्रकारांनी पुरावे मागितले तर त्यावर किरीट सोमय्या कोण आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. त्यामुळं संजय राऊत यांच्याकडे पुरावे आहेत की नाहीत यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ईडीच्या नावावर काय चाललंय देशाला कळायला हवं
ईडीच्या नावावर धमक्या, क्रिमिनल सिंडिकेट, ईडीला पैसे द्यावे लागतात, याचा लवकरच भांडाफोड होईल. काल मी १९ बंगले दाखवा म्हटलं दाखवले का? अर्जुन खोतकर यांना किती त्रास दिला. ईडीच्या नावावर काय चाललेय हे देशाला कळायला पाहिजे.
राऊत यांचे ईडीला पुन्हा आव्हान
संजय राऊत यांनी ईडीला पुन्हा एकदा आव्हान दिले. सोमय्या यांनी १५ कोटी दिलेल्या अधिकाऱ्याबाबत ईडीने माहिती द्यावी, अन्यथा त्या अधिकाऱ्याचे नाव मी उघड करणार असल्याचे आव्हान राऊत यांनी दिले.
किरीट सोमय्या हे कोण आहेत, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या हे भाजप नेते म्हणून बोलत आहेत, असे भाजपने जाहीर करावे असेही राऊत यांनी म्हटले.किरीट सोमय्या यांनी बंगले कुठे आहेत, ते दाखवावे असे पुन्हा आव्हान देताना राऊत यांनी माझी बेनामी संपत्तीही सोमय्या यांनी दाखवावी असे आव्हान दिले.