मुंबई : ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून अभिनेता किरण माने यांना अचानकपणे काढून टाकल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना या मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन नव्या वादाला तोंड फुटलं होतं. याप्रकरणी त्यांनी शरद पवार, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची भेट घेतली होती. ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. किरण माने यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच अनेक गौप्यस्फोटही केले आहेत.
पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा एकच आहे.मला मालिकेतून काढून टाकण्यापूर्वी कोणतंही कारण, तक्रारी याविषयी कोणताही मेल का आला नाही? किंवा, चॅनेललाही तशी नोटीस किंवा मेल का पाठवला नाही? माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत माझी बाजू का ऐकून घेतली नाही? हिंदीमधील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एका मराठी अभिनेत्याला हुकूमशहासारखा आदेश येतो. बेकायदेशीरपणे त्याला काढून टाकलं जातं हे गंभीर आहे, असंविधानिक आहे आणि अन्यायकारक आहे. हे पूर्वापार चालत असेल तर फार भयानक आहे. निदान आता तरी माझ्यानिमित्ताने हे बदलायला हवं. ही माझी इच्छा आहे, असं किरण माने म्हणाले.
पुढे ते म्हणतात, सुरुवातीच्या काळात मला काढून टाकण्यामागे व्यावसायिक कारण असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अत्यंत धक्कादायत आणि नवीन कारण दिलं ते म्हणजे महिलांशी गैरवर्तन. आता महिलांशी गैरवर्तन हे गंभीर स्टेटमेंट आहे.माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे, बदनामीकारक आहेत. मला ठरवून, कटकारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे.
किरण माने यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच त्यांच्या वकिलांनीही त्यांची बाजू सर्वांसमोर मांडली. इतकंच नाही तर सामाजिक स्तरावर किरण माने यांचा जो अपमान झाला आहे त्याप्रकरणी पॅनोरमा आणि त्यांच्याशी संबंधित इतर एजन्सीजला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. किरण माने यांना सामाजिक स्तरावर अपमानित करण्यासोबतच वाळीत टाकण्यात आलं आहे, त्यांची बदनामी झाली आहे आणि स्त्रियांप्रती हा माणूस असंवेदनशील असल्याचं म्हणत त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागला आहे. करिअरच्या बाबतीत त्यांचं जे नुकसान झालं आहे. त्यासाठी पॅनोरमा आणि इतर संबंधित एजन्सीने त्यांना ५ कोटींची नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आम्ही पाठवलेल्या नोटीशीमध्ये केली आहे, असं किरण माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही !
राजकीय पोस्ट केल्याने ‘स्टार प्रवाह’वरील मुलगी झाली हो मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले. किरण मानेंनी केलेल्या या आरोपानंतर हा वाद चांगलाच रंगला. दरम्यान आपली बाजू मांडण्यासाठी अभिनेते किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील किरण माने आणि ‘स्टार प्रवाह’चे क्रिएटिव्ह हेट सतीश राजवाडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. या भेटींनंतर किरण माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरण मानेंनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
यावेळी किरण माने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी माझा काहीही संबंध नाही. शरद पवार सांकृतिक क्षेत्राची माहिती असलेले, सांस्कृतिक क्षेत्राची जाण असणारे एकमेव नेते आहेत. बुद्धिमान विचारी आणि संयमी नेते आहेत. तटस्थपणे ते सगळं ऐकून घेतात. म्हणून मी माझी बाजू त्यांना सांगण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे माझ्या ओळखीतल्या लोकांनी शरद पवारांची माझ्यासाठी वेळ घेतली होती. मी त्यांच्याकडे वेळ मागायला गेलो नव्हतो. त्यांनी मला स्वत: फोन करुन बोलावले होते, असे किरण माने यांनी सांगितले.
किरण माने राजकारणात जाणार असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटले, राष्ट्रवादी काँग्रेसशी माझा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीच नाही तर माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मला माझ्या अभिनय क्षेत्रात रमायला आवडत. तुकारामांच्या निरुपणाचे आजच्या काळात संदर्भ लावून मांडण्यात आनंद वाटतो. इथून पुढे कोणतेही काम मिळाले नाही तर स्वत: करु काही तरी. नागराज मंजूळे एक सिनेमा करतात आणि सगळ्या निर्मात्यांना मागे टाकताता आम्ही देखील त्यांच्यासारखेच काही तरी करू शकतो. त्यामुळे राजकारणात जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही.
अतुल लोंढे माझ्या बाजूने
मी शरद पवारांकडे गेलो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या बाजूने आहे असे नाही. काँग्रेसचे अतुल लोंढे देखील माझ्या बाजूने आहेत. अतुल लोंढे म्हणतात हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. ते काँग्रेसचे आहेत तरीही ते माझ्या पाठीशी आहेत. मी कोणत्याही पक्षाचा नाही. पवारांना भेटल्यानंतर मला वाटले की काही तरी न्यान मिळेल, म्हणून गेलो होतो. बाळासाहेब थोरातांना देखील मी भेटलो. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी मला फोन केले होते. मी अनेक राजकीय राजकीय व्यक्तींवर लिहितो त्यामुळे मी कोणत्या एका पक्षाचा आहे असे अनेकांना वाटत असेल मात्र मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे किरण माने म्हणाले.