Top Newsराजकारण

हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या; अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

पुणे: पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असं म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हानच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.

अमित शाह पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवरच हल्ला करत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो मी मिळवणारच. तर शिवसेना म्हणते सत्ता हा माझा अधिकार आहे. तो कोणत्याही प्रकारे मी मिळवणारच. बनले मुख्यमंत्री. हिंमत असेल तर राजीनामा द्या. तिघांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढा. आमच्याशी दोन हात करा. भाजप कार्यकर्ते तयार आहेत. महाराष्ट्राची जनताही हिशोब करायला बसली आहे, असा हल्ला शाह यांनी चढवला.

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा. देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलं. सर्व गोष्टीत महाराष्ट्र आघाडीवर होता. कृषीपासून ते सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. हे लोक महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ शकते का? हे निकम्म सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

लक्ष्य कमी ठेवू नका

पुणे महापालिकेत लक्ष्य कमी ठेवू नका. कोणी म्हणतं शंभर जागा जिंकू तर कोणी म्हणतं ११० जागा जिंकू. तुम्ही लक्ष्य कमी ठेवू नका. जनता खूप द्यायला तयार आहे. तुम्ही मागताना कंजुषी करू नका, असं शहा यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्र्यांची तब्येत ठिक नाही. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं. पण जेव्हा त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाही कुठे ते बाहेर फिरत होते? तेव्हाही सरकार कुठे आहे याचा जनता शोध घेत होती. कोरोना काळात मोदींनी २० वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तीन वेळा राज्यपालांशी संवाद साधला. अनेक रुग्णालयांशी संवाद साधला, असंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात

२०१९ मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

त्या बॅनरवरील तुमच्या आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा

स्वत: ठरलेल्या गोष्टींवर घुमजाव केलं आणि म्हणतात मी खोटं बोलत आहे. मी खोटं बोलतोय असं थोडावेळ मानूही. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमच्या फोटोची एक चतुर्थांश साईज होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होते. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितलं होतं की, फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसले, असा हल्लाही त्यांनी चढवला.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’चा अर्थ काय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी चुकीचा अर्थ घेतल्याचं सांगत अमित शाह यांनी चांगलीच टोलेबाजी केली. पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसनं त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रानस्फरमध्ये कटमनी घेणारं सरकार हवं? असा सवाल शाह यांनी केलाय.

मोदींनी इंधनाचे दर कमी केले, यांनी दारू स्वस्त केली

देशात इंधर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील टॅक्स कमी केला. त्यावेळी मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला कर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला. पण यांना काही वेगळंच ऐकायला आलं, यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली. असे भाई, दारू स्वस्त करायची नव्हती, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचं होतं, अशी खोचक टीका शाहांनी केलीय. तसंच आता उद्धव ठाकरे सरकारला विचारायला हवं की देशात पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी स्वस्त झालं, महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील जनतेला दारु नाही तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त हवं आहे, असंही शाह म्हणाले.

काँग्रेसकडून बाबासाहेबांचा सातत्याने अपमान; काँग्रेसवर हल्लाबोल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर केली.

शाह यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला, असा हल्ला शहा यांनी काँग्रेसवर चढवला.

संविधानानुसारच देशाचा कारभार

स्वातंत्र्यानंतर संविधान बनिवण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान राहिलं आहे. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. कटु अनुभव घेतले. पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारं संविधान आहे हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकलं, असं शहा म्हणाले. मोदीही भारताच्या संविधानाला आपला ग्रंथ मानून देश चालवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं

जेव्हा देशात अंधारयुग होतं. आशेचा एक किरणही दिसत नव्हती. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणंही जेव्हा कठिण होतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचं सौभाग्य मिळालं, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्याच्या विकासात कसूर ठेवणार नाही

पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल. स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिल्या. मुळा मुठा निधी संवर्धनासाठी ११० कोटींचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

देशात लवकरच राष्ट्रीय ‘सहकार’ विद्यापीठाची स्थापना होणार

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (वामनीकॉम) संस्थेमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. तीच उत्तम, दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवावी. देशाची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलर होणार आहे. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामध्ये मोठे योगदान असेल. देशात लवकरच ‘राष्ट्रीय सहकार’ विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यात या विद्यापीठाची एक शाखा असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या २७ व्या पदवी बॅचचा तर ५३-५४ व्या पदविका बॅचच्या दीक्षांत समारंभप्रसंगी केंद्रीय सहकार अमित शाह बोलत होते. शाह म्हणाले, की पुणे शहर ऐतिहासिक असून देशाच्या शिक्षणाचे माहेरघर आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वदेश, स्वधर्माचा नारा दिला आहे. तोच नारा घेऊन केंद्र सरकार देशात काम करत आहे. वस्तूत: याआधीच देशात सहकार मंत्रालयाची स्थापना करायला हवी होती. परंतु, ती आम्ही केली. सहकारात मोठी क्षमता असून कामाबरोबर आत्मसन्मान देखील आहे.

सहकारातील चुकीच्या गोष्टींना पायबंद घालणार

सहकाराशिवाय १३० कोटी लाेकांना आत्मनिर्भर बनविणे शक्य नाही. सहकारात काही चुकीच्या गोष्टी घडत आहे. त्यावर आम्ही पायबंद घालणार आहोत. त्यासाठी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह ॲक्ट, प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी (पॅक्स) या तसेच इतर काही ॲक्टमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. सुरूवातीला सर्व सहकारी बँका संगणकीकरणातून जिल्हा बँकांना जोडणार त्यानंतर नाबार्डबरोबर जोडून पारदर्शकपणा आणणार आहे. गावागावात सहकार पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, असे मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (वामनीकॉम) संस्थेचा परिसर मोठा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार नवीन विद्यापीठासाठी किमान १० एकर जागा हवी असते. पुणे विद्यापीठाच्या बाजूला वामनीकॉमची १५ एकराची जागा आहे. तसेच सभागृह, निवास व्यवस्थांसह इतर सर्व सोयीसुविधा आधीपासून तयार आहेत. सहकारमंत्री अमित शाह यांच्याबरोबर विद्यापीठ स्थापन करण्याबाबत यापूर्वीच बोलणी झाली आहे. याबाबत ते लवकरच घोषणा करणार आहेत, अशी माहिती सहकार तज्ज्ञ तथा दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि.चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी याप्रसंगी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button