मुंबई : शिवसेना-भाजप युती ३० वर्षे टिकली, मग आघाडी किती टिकणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सेना-भाजप युती आणि महाविकास आघाडीवर रोखठोक भाष्य केलं. ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही. शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी २५-३० वर्षे युती केली, ती प्रेमाने केली आणि टिकवली. एका दिलाने, विचाराने एकत्र राहिलो. काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमची युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. युती किंवा आघाडी कशासाठी होते, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
पुन्हा भाजप-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात तर या अफवाच आहेत का?, असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो. यावेळी उद्धव ठाकरेंना सेना भाजप एकत्र येऊ शकतात का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल.