दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क माफ
मुंबई : परीक्षेसाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत दिली.
राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. सदस्य अभिजित वंजारी, अनिल तटकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. कुठलेही विलंब शुल्क न भरता इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत इ.१२ वीचे १४,३१,६६७ आणि इ.१० वीचे १५,५६,८६१ आवेदन पत्रे प्राप्त झाले आहेत. शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली