अंबरनाथ : समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी तुमची खैर नाही, अशा शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री नवाब मलिक यांना इशारा दिला आहे. अंबरनाथमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात किरीट सोमय्या बोलत होते. अंबरनाथच्या कार्यकर्ता मेळाव्यात सोमय्या यांनी आघाडी सरकार आणि त्या आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करत सरकारचा खरपूस समाचार घेतला.
नवाब मलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर जाहीरपणे टीका करत त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. नवाब मलिक हे राज्यातल्या सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत? की ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते आहेत? असा सवाल उपस्थित केला. नवाब मलिक हे नेमके शरद पवारांचे प्रवक्ते आहेत की ठाकरे सरकारचे प्रवक्ते आहेत, हे त्यांनी आधी जाहीर करावे. नवाब मलिक यांच्या तोंडून नेमकं राष्ट्रवादी बोलतोय की ठाकरे सरकार बोलतोय हे आधी जनतेला जाहीर करावे आणि त्यानंतर त्यांनी समीर वानखेडेवर आरोप करावे, असा सल्ला दिला. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यावरही सोमय्या यांनी निशाणा साधला. जरंडेश्वर साखर कारखान्याचे खरे मालक हे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या बहिणी आहेत. हिंमत असेल तर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र द्या आणि माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा, असे खुले आव्हान सोमैय्या यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आता, एनसीबीने पत्रक जारी करत याचं स्पष्टीकरण दिलंय. वानखेडे यांच्या मुंबईसाठी बदलीच्या अर्जाबाबतचंही एनसीबीने सांगितलंय.