
जालना: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासारखा वाघ मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था ही भेदरलेल्या मेंढरंसारखी सारखी झाली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला.
दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत संजय राऊत आणि शिवसेनेला उत्तर दिले आहे. जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले आहेत. हे वाघ नाहीत मेंढी आहेत. हे वाघ नाहीत यांनी फक्त वाघाचा चेहरा लावला आहे. या वाघाला शेपटी पण नाही, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे.
दोन वर्षांपासून ठाकरे सरकार महाराष्ट्रात काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरुन सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे. पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.