कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. ते म्हणाले की, एमपीएससीच्या २१८५ तरुणांच्या बाबतीत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. अजित पवार यांना पुन्हा एकदा फोन करून विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, समाजाला रस्त्यावर आणून आंदोलन करणार नाही. समाज बोलणार नाही, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. अधिवेशनात कुणीच काही बोलले नाहीत. मी मुळातच शांत स्वभावाचा आहे, कधी आवाज वाढवायचा, कधी काय करायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, मी आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे मांडले. नरेंद्र पाटील यांनी कसे आरक्षण मिळणार हे देखील मांडले. ते काही चुकीचे करतील असे मला वाटत नाही. नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.
मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी २१ दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी २१ जून रोजी सांगितले होते. सरकारने २१ दिवसात निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असं संभाजीराजे म्हणाले होते. आम्ही मराठा समाजाचे पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरनंतर नाशिकला आंदोलन झाले. या दोन्ही आंदोलनाला अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. कोल्हापूरचे आंदोलन झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकार भेटायला तयार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर आम्ही भेट घेतली. जवळपास ३ तास चर्चा झाली. त्यानंतर सरकारने आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला. म्हणून तो आम्ही दिला आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. तसेच मूक आंदोलन स्थगित नसून या काळात आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जात समन्वयकांशी चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं होतं.