Top Newsराजकारण

बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे नसते, तर मोदींचे अस्तित्वच संपले असते; शिवसेनेची टीका

चिपळूण : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा सुरू असून, यात आता शिवसेना आणि भाजपच्या वाढत्या आरोप-प्रत्यारोपाची भर पडली आहे. अनेकविध विषयांवरून भाजप शिवसेनेवर टीका करत असून, शिवसेना भाजपला त्याच भाषेत प्रत्युत्तर देताना दिसत आहे. यातच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे राहिले नसते, तर मोदींचे अस्तित्वच संपले असते, अशी टीका केली आहे.

सावर्डे विभागीय शिवसेना मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मराठी माणसाला संपविण्यासाठीच हे मोठे षडयंत्र भाजपने आखले आहे, असा मोठा आरोप जाधव यांनी यावेळी केला. भाजप खालच्या पातळीवर जाऊन, मर्यादा सोडून टीका करत आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.

मुंबईतून मराठी माणसाला बाहेर काढायचे असा भाजपचा मोठा डाव आहे. गुजरात दंगलीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले म्हणूनच आता मोदी पंतप्रधान आहेत, हे विसरू नका. अन्यथा मोदी यांचे अस्तित्वच संपले असते, हेही लक्षात ठेवा, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना केली. भाजप पक्ष शिवसेनेचं बोट धरून केवळ राज्यात नाही तर देशात वाढली तीच भाजप आता सेनाभवन तोडण्याची भाषा करू लागली आहे. मुंबई महानगर पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप सूडबुद्धीने वागत आहे. ईडी, एनसीबी, सीबीआय, इन्कम टॅक्स अश्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

केवळ भाजप सोडून सगळे लोक भ्रष्टाचार करतात का, अशी विचारणा करत ज्यावेळी सरकार बनत नव्हते, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार कोणी बनवले? भाजपनेच ना? मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला? तीन पायाचे सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत जे घटक आहेत त्यांनी भाजपचे हिंदुत्व स्वीकारले आहे का ते सांगावे, असा खोचक सवालही जाधव यांनी यावेळी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button