रविचंद्रन अश्विन आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने पटकावला होता. त्यापाठोपाठ आता फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताच्याच खेळाडूला मिळाला आहे. नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली आणि भारताच्या या यशात सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने. अश्विनला अष्टपैलू कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. आता तोच फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. या पुरस्कारासाठी अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कायेल मेयर्स यांच्यात स्पर्धा होती.
अश्विनने फेब्रुवारी महिन्यात तीन कसोटी सामने खेळले. त्याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. त्याने एकूण तीन सामन्यांत १७६ धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध तीन कसोटीत त्याने २४ विकेट घेतल्या. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताला इंग्लंडविरुद्ध दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जिंकण्यात यश आले. तिसऱ्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेटचा टप्पाही गाठला होता.