मी मूळचा मिरज या गावचा. सांगली जिल्ह्यातील औषधोपचाराची ख्याती असणारे शहर म्हणजे माझे गाव… क्रिकेटचे वेड होते… सांगलीत बाहेरून येणाऱ्या वकिलांच्या टीम अनुभवत होतो आणि केवळ क्रिकट खेळायला मिळेल म्हणून लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. योगायोग असा की, मोठी बहीण लग्नानंतर नाशिकला आली. काही ना काही निमित्ताने नाशिकमध्ये येणे-जाणे वाढले. नंतर काही अपरिहार्य कारणाने बहिणीसोबत थांबण्याचा घरातून निर्णय झाला आणि मी वकिलीच्या शेवटच्या वर्षात असताना नाशिकमधील ‘केटीएचएम’मध्ये प्रवेश घेतला. तिथेही क्रिकेटसोबत जोडले गेलो. पदवी घेतली आणि नाशिक न्यायालयात प्रॅक्टीससाठी आलो. दुपारच्या कामातून निवांत झालो की आम्ही नवखे वकील पार्किंगमध्ये यायचो. कधी कधी तिथेही क्रिकेटच्या गप्पा व्हायच्या. मग कळाले की, जगदाळे के. के. वाघच्या मैदानावर वकिलांच्या मॅचेस घेतात. मी तिथे गेलो.. मलाही खेळायचं आहे असं त्यांना सांगितलं… जगदाळेंनी कसलीही चौकशी न करता खेळण्याची संधी दिली.. पहिल्याच मॅचपासून मी त्यांचा आवडता खेळाडू झालो. मग त्यांच्यासोबतचा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. आजवर जेवढया मॅचेस खेळल्या त्या प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही शिकायला मिळालं… ते खेळांडूना सिंगल पैसाही खर्च करु देत नाहीत. महाराष्ट्रातील वकिलांसाठी जगदाळे यांनी क्रिकेटचे मैदान म्हणजे एक कुटुंब तयार केले आहे. त्यांच्यामुळे माझी जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात क्रिकेट खेळणारा वकील म्हणून ओळख तर झालीच पण कामेही मिळाली. कोणतीही अडचण असो ते हमखास पाठीशी उभे राहतात. मी या आधी बारच्या इलेक्शनसाठी उभा होतो. तेव्हा माझा मित्र रत्नदीप गायकवाड, तो ही खेळाडू, तोही निवडणूक लढवत होता… दोघेही जगदाळेंचे आवडते… त्यांनी दोघांना बोलावून कुणीतरी एकाने माघार घ्या आणि एक खेळाडू आपण बारवर पाठवू असा सल्ला दिला… पण आम्ही दोघांनीही तो मानला नाही आणि दोघाांनाही त्याचा फटका बसला… हा पराभव पचवून मी तिसऱ्यांदा पुन्हा निवडणूक लढवली तेव्हा जगदाळेंनी मागचा राग मनात न ठेवता मला भरघोस मदत केली आणि मी निवडून आलो. त्यांनी मला कायमच पाठिंबा दिला आहे. मधल्या काही काळात मी त्यांच्यापासून बाजूला झालो होतो. काही मंडळींनी खेळात राजकारण आणले. मला ते पटले नाही. ते मला समजवायचे, पण मी स्वत:हून बाजूला झालो. त्याकाळात मी जगदाळेंना खूप दुखावले, त्याची सल मला आजही कायम टोचत राहते. कालांतराने मी फक्त आणि फक्त जगदाळेंच्या मोठेपणापायी, त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळेच त्यांच्यासोबत आलो. त्यांच्यासोबत कोणी कसेही वागले तरी जगदाळे त्यांच्याप्रती अत्यंत सकारात्मक असतात. कोणालाही ते कधी दुखावत नाहीत. त्यांच्या याच स्वभावामुळे मी आज पुन्हा त्याच प्रेमाने, आपुलकीने त्यांच्यासोबत आहे… फक्त क्रिकेट किंवा वकिलीच नाही तर माणुसकीचे धडेही मला त्यांच्याकडून अनुभवता आले आहेत.