किव्ह/मास्को : रशियाने गुरुवारी युक्रेन विरोधात युद्धाला सुरुवात केली. रशियाच्या हल्ल्यांनंतर यूक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. रशियाने राजधानी कीवला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. अशा संपूर्ण स्थितीत यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की हतबल झाल्याचे दिसत आहेत, तर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीही हात वर केले आहेत. यावर बोलताना झेलेन्स्की यांनी, ‘रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले गेले आहे,’ अशा शबद्धात आपली वेदना व्यक्त केली. याच बरोबर, रशियन हल्ल्यांत युक्रेनच्या १३७ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३१६ जण जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. याच वेळी, युक्रेन रशिया विरोधातील युद्धासाठी सैन्याची जमवाजमवही करत आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हवाल्याने एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या पहिल्या दिवसाच्या युद्धात आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही, तर रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला ‘एकटे सोडले’, असेही राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या रशिया-यूक्रेन संघर्षाचं रुपांतर युद्धामध्ये झालं. रशियानं यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करत मिसाइल हल्ले केले. रशियानं युक्रेनची राजधानी कीवला चहूबाजूने घेरलं आहे. अनेक शहरात स्फोट घडवले आहेत. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर उमटू लागलेत.
युक्रेनवर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी रशियाचा निषेध केला आहे. बायडन म्हणाले की, रशिया युक्रेनवर हल्ला करणार याबाबत आधीपासून अंदाज होता. पुतिन हल्लेखोर आहे. त्यांनी युद्धाचा पर्याय निवडला. परंतु पुतिन आणि रशियाला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. जगातील बहुतांश देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. आम्ही रशियावर आणखी कडक निर्बंध लागू करू असा इशारा त्यांनी दिला. युक्रेन-रशियाच्या युद्धाचा परिणाम अमेरिकेवरही पडू शकतो. युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्य आहे. आम्ही सायबर हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयार आहोत. मात्र युक्रेनमध्ये सध्या अमेरिकेचे सैन्य पाठवणार नाही. नाटो देशांच्या इंचभर जमिनीचं आम्ही रक्षण करू. आगामी काळात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्याचा काही संबंध नाही असंही ज्यो बायडन यांनी स्पष्ट सांगितले.
रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला सुरु केला. हा पूर्वनियोजित हल्ला असून याचं प्लॅनिंग गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होतं. आम्ही जी-७ देश मिळून रशियाला उत्तर देऊ. रशियाच्या ४ आणखी बँकांवर निर्बंध लावले आहेत. रशियाची महत्त्वाकांक्षा खूप वेगळी आहे. आज आम्ही ज्या जागेवर आहोत तिथं रशियाला पोहचायचं आहे असंही ज्यो बायडन यांनी म्हटलं आहे.
ब्रिटननेही रशियावर लावले निर्बंध
रशियाने युक्रेनवर हल्ला केला परंतु त्याला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागेल अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युद्धावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ब्रिटनला रशियाच्या विरोधात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सादर करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांत रशियाच्या मालकीची बँक व्हीटीबीची संपूर्ण मालमत्ता गोठवण्याचे अधिकार आहेत. ‘सर्वात मोठ्या आणि सर्वात कठोर पॅकेज’मध्ये रशियन बँकांना देशाच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर काढण्याची परवानगी देणे समाविष्ट आहे.
पुतिन यांच्याविरोधात रशियातच ऊग्र आंदोलन
जगभरातून रशियाच्या या कारवाईचा विरोध होत आहे. खुद्द रशियातही या कारवाईचा अथवा रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा विरोध होत आहे. या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांत लोक आंदोलन करत आहेत. तसेच लोक राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या या कारवाईवर टीका करत आहेत. या विरोधाला गुरुवारपासूनच सुरुवात झाली आहे. हा हल्ला योग्य नाही, असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह ५३ इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.या आंदोलकांना रोखण्यासाठी रशियन पोलीसही तयार आहेत. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या १७०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचे वृत्त जगभर पसरताच अनेक देशांमध्ये याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. लोक बॅनर आणि पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरत आहेत आणि रशियाच्या या कृतीचा निषेध करत आहेत.