बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला आज निश्चित होणार?
पुणे: महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. शिक्षण मंडळाकडून रविवारी म्हणजेच २० जूनला महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी निकालासंदर्भात फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं नेमकं मुल्यांकन कसं करायचं यासाठी यापूर्वी राज्य मंडळाच्या बैठका झाल्या. उद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलीय. त्या बैठकीत फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल.
बारावी निकालासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अकरावी परीक्षेच्या गुणांना सर्वाधिक वेटेज दिलं जाणार असल्याची माहिती आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या निकालासाठी जे सूत्र अवलंबण्यात आलं त्यानुसार फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती आहे. सन २०२०-२१ या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात आली आहे.