मुंबई : महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचे निकष जाहीर केले आहेत. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी गुण विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रावर आधारित असणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने बारावी निकालाचे निकष सीबीएसई मंडळाप्रमाणे ३०:३०:४० या सूत्रावर आधारित असतील, असे म्हटले आहे. प्रत्येक महाविद्यालयाकडून निकलासाठी निकाल समिती स्थापन करण्यात येणार असून, निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ३० सूत्रात ग्राह्य धरले जातील. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ३० सूत्रात ग्राह्य धरले जातील, तर इयत्ता बारावीसाठी ४० टक्के सूत्र निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्ष, सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषयनिहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. याशिवाय पुनर्परिक्षार्थी म्हणून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ५० टक्के आणि बारावीतील सर्व चाचण्या, गृहप्रकल्प, तत्सम अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण समाविष्ट असतील. तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन , दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.