सावंतवाडी : तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून कोण रूग्णालयात दाखल झाले असेल. तर त्याची उत्तरे अधिकाऱ्यांना द्यावी लागतील. आरोपीने कोठडी बघितल्यावर त्याची तब्येत बिघडते कशी? याची खात्री प्रशासनाने करणे गरजेचे होते. मी गृहराज्यमंत्री असताना असे प्रकार घडत असत. त्यावेळी अधिकाऱ्यांना खात्री करण्याचे निर्देश देत होतो, आता असे कोणीतरी केले पाहिजे असा सल्ला माजी गृहराज्यमंत्री तथा आ. दीपक केसरकर यांनी सरकारला दिला आहे.
ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. केसरकर म्हणाले, काहीजण सरकार राणे यांना मुद्दामहून अडकवतात असे सांगतात. पण त्यांना जर सरकारला अडकवायचेच होते तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा का दिला नाही असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सरकारवर टीका करणे योग्य नसल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.
मी मंत्री असताना एका प्रकरणात आ. नितेश राणे यांना पोलीस कोठडी झाली होती. त्यावेळी त्यांनी तब्येतीचे कारण देऊन रूग्णालयाचा आधार घेतला होता. पण मी तज्ज्ञ डॉक्टरांना तिथे पाठवले, त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्याच्या तब्येतीला काही झाले नाही म्हणून पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. याची आठवण केसरकरांनी करून दिली. कोणीतरी असे काम ठामपणे करू शकेलं का? असा सवाल केसरकर यांनी केला. आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असता तर राणेंना जामीन मिळालाच नसता. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका योग्य नाही. आतातरी राणेंनी चांगले वागावे नाही, तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल, असाही टोलाही केसरकर यांनी लगावला. माझं कोण व्यक्तिगत दुश्मन नाही, पण सर्वांनी चांगल वागले पाहिजे. जिल्हा शांत राहिला पाहिजे तर या ठिकाणी समृद्धी येईल, पर्यटन वाढेल. मागील पाच वर्षांत कोणाचे डोके वर काढण्याची हिम्मत झाली नव्हती. जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येत होते. पण पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यास पर्यटक जिल्ह्यात फिरकणार नाहीत असे मतही केसरकर यांनी यावेळी मांडले.
नितेश राणेंना जिल्हा रूग्णालयात केले दाखल
संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत कणकवली दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने नितेश राणेंना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच ठीक नसल्याचे त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नितेश राणेंना जिल्हा रूग्णालयातही आणण्यात आले होते.
नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात न ठेवता रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी केली होती. नितेश राणे यांनीही ही माहिती न्यायालयात दिल्याचे समजते. दिवाणी न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे यासंबंधीचा अर्ज दिला होता. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. याबाबत आम्ही न्यायालयाला कळवले आहे. न्यायालयात सुनावनी नंतर आमदार राणे यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. यासंदर्भात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नितेश राणे यांना कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.