Top Newsराजकारण

भाजीपाला विकणारे भुजबळ २५ हजार कोटींचे मालक कसे?; शिवसेना आ. सुहास कांदेंचा सवाल

नाशिक: भाजीपाला विकणारे छगन भुजबळ २५ वर्षात २५ हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली. त्यामुळे कांदे-भुजबळ वाद आणखी विकोपाला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले. अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस आयुक्त करतील. मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला भुजबळांच्या बाजूनं श्रीलंकेवरून धमकीचा फोन आला होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

१२ कोटी निधी आला यातील १० कोटी रुपये भुजबळांनी ठेकेदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त २ कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेतलं पाहिजे. भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचं भांडण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही भुजबळांवर जोरदार टीका केली. भुजबळांनी नियोजनाचा निधी काँट्रॅक्टरच्या घश्यात घालायचं काम केलं आहे. पालकमंत्री अन्याय करत आहेत, असं करंजकर म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना स्वबळावर लढणारी संघटना आहे. पालिका निवडणुका तोंडावर आहे. आम्हाला गुंड्या-तोड्या करण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. भुजबळांनी भ्रष्टाचार केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. मी त्यांच्यासमोर केव्हाही चर्चेला तयार आहे, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button