मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील बैठकीच्या चौकशीचे मुंबई पोलिसांना आदेश दिल्याचे आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.
चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची तब्बल एक तास भेट झाली होती. यावर वळसे-पाटील म्हणाले की, परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात काल जी भेट झाली, त्यानंतर मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंग यांच्या चौकशीसाठी दबाव असण्याचे काही कारण नाही. परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेमुळे सर्व पोलीस स्टेशनमधील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्याचा ते जबाब देत आहेत.
सीबीआयच्या राज्य सरकार सहकार्य करत नसल्याच्या दाव्यावर बोलताना पाटील म्हणाले की, राज्य सरकार आपलं काम करतयं, सीबीआय आपलं काम करतयं, सहकार्य करण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. राज्य सरकार जिथे कृती करायला पाहिजे तिथे बरोबर कृती करतंय, असंही वळसे पाटील म्हणाले.
परमबीर सिंग यांना अनेकदा समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत यावर नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती कारवाई निश्चित होईल. हे खूप चुकीचे आहे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला न्यायालयाच्या परवानगीशिवाय भेटण्याची परवानगी नसते. तरीही परमबीर सिंग यांनी वाझेची भेट घेतली. परंतु नेमकी ही भेट कशी झाली याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असंही पाटील म्हणाले.
वाझे-देशमुख यांचीही भेट?
परमबीर सिंग आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहिले होते. यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या. याप्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशातच आज सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातही भेट झाल्याचं बोललं जात आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगाच्या कार्यालयाबाहेर एकाच खोलीत जवळपास १० मिनिटं होते. एकाच प्रकरणात चौकशीच्या फेरीत अडकलेल्या सिंग, देशमुख आणि वाझे यांच्यातील भेटीगाठींच्या सत्रामुळं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. त्यावेळी चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंग आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये तब्बल एक तास संवाद झाला. एका खोलीत तब्बल एक तासासाठी त्यांचं बोलणं झालं. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं ते कळू शकलेलं नाही. दरम्यान परमबीर आणि वाझेंच्या भेटीवर अनिल देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. अशातच आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बंद दाराआड १० मिनिटं चर्चा झाली.