विदर्भवाद्यांकडून वीज बिलांची होळी; स्वातंत्र्यदिनी अन्नत्याग आंदोलन
नागपूर (रविकांत साने ) : कोरोना काळात आधीच जनता आर्थिक संकटात असताना सरकारच्या वीज वितरण कंपनीने वीज दरात वाढ केली, भरमसाठ वीज बिल पाठवले. सरकारच्या या कृतीचा निषेध करत विदर्भवादी महिलांनी ‘दिल्लीत वीज स्वस्त, महाराष्ट्रात जनता दरवाढीने त्रस्त’ असा नारा देत विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे यांच्या नेतृत्वात शेकडो वीज बिलांची होळी केली. दरम्यान, या नाकर्त्या सरकारवर रोष अधिक तीव्र करण्यासाठी आता विदर्भवादी स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यासंदर्भातील ठराव विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे पारित करण्यात आला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांतिदिनापासून इतवारीतील शहीद चौकात असलेल्या विदर्भ चंडिका मंदिराच्या सभामंडपात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या आज सहावा दिवस होता. कोरोना हे राष्ट्र व राज्यावर आलेले नैसर्गिक आपत्ती होते. सरकारी बंधनांमुळे या काळात उद्योग, व्यापार, शेती, रोजगार नसल्यामुळे जनतेची क्रयशक्ती संपली आहे. त्यातच वीज बिल वाढवून राज्य सरकारने जनतेची लुटमार चालवली आहे. वीज कनेक्शन कापणे शासनाने त्वरित बंद करावे, वीज बिल माफ करावे अन्यथा वीज महावितरणच्या कर्मचा-यांना घरातल्या महिला चोप देतील, असा इशारा रंजना मामर्डे यांनी दिला. या आंदोलनात प्रामुख्याने सुनिता येरणे, रेखा निमजे, उषा लांबट, ज्योती खांडेकर, विणा भोयर, जया चातुरकर, शोभा येवले, संगीता अंबारे, सुहासिनी खडसे, कुंदा राऊत, प्रभा साहू, कोमल दुरूगकर, माया बोरकर इत्यादी महिला सहभागी झाल्या होत्या. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ सरकारने जनतेवर लादली असून कॉंग्रेसच्या काळात टिका करणारे आता त्याबद्दल काही बोलत नाही, असे अॅड. वामनराव चटप म्हणाले.
अन्नत्याग आंदोलन
आंदोलनाच्या सातव्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सकाळी १० पासून उपोषणाला प्रारंभ होईल. दुपारी ३ वाजता कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात आंदोलनाच्या दुस-या टप्प्याची घोषणा करण्यात येणार आहे.