परमबीर सिंग यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेल्या चौकशीविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. हे नमुद करताना हायकोर्टाने ही सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा दावा परमबीर सिंग यांनी याचिकेत केला आहे.
परमबीर सिंग यांनी याचिकेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. दरम्यान, संजय पांडे यांनी परमबीर यांची चौकशी करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर राज्य सरकारने नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही याचिका निरर्थक ठरली आहे, असं म्हणणं सरकारतर्फे मांडण्यात आलं. त्यामुळे सध्या तातडीची सुनावणी आवश्यक नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.
मुळात याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाच दाखल होऊ शकत नाही. हा पूर्णपणे सेवाविषयक विषय आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणासमोर जायला हवं होतं. त्यामुळे ही याचिका सुनावणी योग्यच नाही, असा युक्तिवाद राज्य सरकार, पोलीस महासंचालक यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर केला. तर पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी देखील त्यांच्या वकिलामार्फत म्हणणं मांडताना आपल्या तक्रारीवर राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशी सुरु केली असताना परमबीर सिंग यांनी मला याचिकेत प्रतिवादीच केलेलं नाही, असं म्हटलं.