अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नागराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी आढळून आल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत देण्यात येत होते. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.
आयपीएस अधिकारी हेमंत नागराळे हे १९८७ च्या बॅचचे अधिकारी असून पोलीस दलातील महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. याचबरोबर नागराळे यांच्याकडे सध्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मात्र आता त्यांच्याकडे मुंबई पोलीस दलाचा कारभार सोपविण्यात आला आहे.
रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे राज्य सुरक्षा मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली असून परमबीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण भलतेच तापले होते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या एक बैठक होवून याविषयाच्या अनुषंगाने चर्चाही झाली. त्यानंतर पोलीस दलातील बदलाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही निवडक पोलीस अधिकाऱ्यांची चर्चाही केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील फेरबदल केल्याचे जाहीर केले.